निराधारांची गर्दी
धारूर : येथील तहसील कार्यालयाने निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. त्यामुळे सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात.
बीड शहरातील नाल्यांची सफाई नाही
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, जिजामाता चौक, मोंढा रोड, सुभाष रोड, माळी वेस, दत्तनगर, धोंडीपुरा, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
बचावासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम
अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. अनलाॅकनंतर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. संभाव्य कोरोनाची लाट ओळखून शहरवासियांनी दक्षता घ्यावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे.