केजमध्ये आज शिवसेनेची बैठक
बीड : शिवसेेनेचे संपर्क नेते चंद्रकांत खैरे, रोहयो व फलोत्पादन संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केज येथे आज, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.
अनधिकृत गतिरोधक
बीड : बीड ते तेलगाव या महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत गतिरोधक करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसून हे गतिरोधक बसविल्याचे समोर आले आहे. नियमाप्रमाणे गतिरोधक ठेवून होणारे अपघात टाळावेत व अनधिकृत गतिरोधक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
पथदिवे सुरू करावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. दुरुस्तीकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष आहे. कबाडगल्ली, बुंदेलपुरा, जव्हेरी गल्ली, मोमीनपुरा भागामध्ये काही पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.
कार्यालयांना
गाजर गवताचा वेढा
पाटोदा : शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.