अंबाजोगाई :
रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध महागडं आहे. अशी औषधे ही गरीब लोकांनाही उपलब्ध झाली पाहिजेत. या माणुसकीच्या दृष्टिकोनातून रेमडेसिविर इंजेक्शन बीड जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनास केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषद,पोलीस प्रशासन, सर्व नगरपालिका, शासकीय विभाग आणि आरोग्य विभाग मागील एक वर्षापासून कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध काम करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरासह बीड जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. जिल्ह्यात सध्या वर्षभरात सापडले नाहीत, अशी उच्चांकी रुग्णसंख्या एप्रिल महिन्यांतच गाठल्याने आरोग्य सेवा पुन्हा डळमळीत होऊन औषधांचा काळाबाजार सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेत बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे.त्यामुळे विक्रेत्यांनी छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत. सरकारच्या निर्देशानुसार हे इंजेक्शन ठरवून दिलेल्या किमतीतच दिले गेले पाहिजे हे तपासणारी यंत्रणा हवी,त्याहून अधिक किंमत घेणाऱ्या हॉस्पिटल अथवा औषध दुकानांवर कारवाई प्रशासनाकडून अपेक्षित असल्याचे प्रशासनाला निवेदनात म्हटले आहे.
रेमडेसिविरअभावी मृत्यू होऊ नयेत
रेमडेसिविर इंजेक्शन नाही म्हणून कोणत्याही गरजू,गरीब रुग्णाचा मृत्यू होऊ नये. हे औषध महागडं आहे. पण,अशी औषधे ही गरीब लोकांनाही उपलब्ध झाली पाहिजेत.या माणुसकीच्या दृष्टीकोनातून आवश्यकता भासल्यास प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करावीत,तसा निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, नगरसेवक महादेव आदमाने, मनोज लखेरा, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,जावेद गवळी आदींनी प्रशासनाकडे केली आहे.
सर्वसामान्यांना भुर्दंड
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा मर्यादित असल्यामुळे अनेक रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांना औषधांच्या दुकानांतून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगतात. मात्र,योग्य पुरवठा असूनही संबंधित औषध दुकाने तसेच रुग्णालयांत त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने माफक किमतीला विकण्याचे निर्देश दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात तब्बल दोन ते पाच हजारांपर्यंत विकले जात आहे. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.