बीड : शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांसमोर असलेल्या गटारी तुंबल्या आहेत. काहीवेळा गटारीचे पाणी रस्त्यावरच जमा होते. त्यामुळे दुर्गंधी सुटत असून, येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. नागरिकांतून स्वच्छतेची मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्डे
बीड : शहरातील हनुमान मंदिर ते सम्राट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. खड्ड्यांचा आकार वाढत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत. दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नियंत्रणाची मागणी
गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. अवैध वाळू माफियांवर नियंत्रण ठेवून कडक कारवाईची मागणी होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे कोंडी
बीड : शहरातील भाजीमंडईत असलेले अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.