गेवराई (ज. बीड ) : महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रय प्रभूंचे नित्य भोजन स्थान असलेले श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे मंगळवारी श्री दत्त्तात्रय जन्म महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार असल्याचे श्री दत्तात्रय आत्मतिर्थ प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
पहाटे चार ते पाच अभिषेक (स्नान ) तर पाच ते सहा वाजेदरम्यान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. त्यानंतर सात ते नऊ दत्तात्रेय बाळक्रीडा ग्रंथाचे व दत्तात्रेय स्त्रोत्राचे पठण व पारायण होईल. सकाळी ११ ते ११.३० आत्मतिर्थ स्नानाचे स्नान करून १२ ते १२.३० वाजेदरम्यान महाआरती होणार आहे. तसेच रात्री श्रीदत्तात्रय प्रभूंची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री दत्तात्रेय जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना सकाळी श्री दत्तात्रय प्रभू आत्मतिर्थ प्रतिष्ठान तर्फे शुद्ध तुपातील लाडू प्रसादाचे वाटप करऱ्यात येणार आहे. दुपारी महापंगतीचे आयोजन केल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. श्री दत्तात्रय प्रभुंचे भोजनस्थान म्हणून महत्त्व असल्याने बीडसह लगतच्या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने पांचाळेश्वर येथे दर्शनासाठी येतात.