ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांमधून सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. ग्राहकसेवा केंद्राकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात बँकांनी दक्षता बाळगावी व ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.
आधारलिंक बंधनकारक
अंबाजोगाई : स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने सर्व नगर परिषद तसेच नगर पंचायतींना शासनाकडून आधार फिडिंगचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक अर्जदाराच्या अर्जासोबत आधार लिंकिंग करण्यात आले आहे. शासनाने ही अट घातल्याने आधार लिंकिंगसाठी आधार केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.
नुकसानीचे पंचनामे नाहीत
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे शेतकºयांच्या गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज व विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा व ज्वारी भिजल्याने ज्वारी काळी पडू लागली आहे. तर हरभरा डागील झाला आहे. गहाचे पीकही पांढरे पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्या वतीने अद्यापही पंचनामे नाहीत. पंचनामे करावे. अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.
रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षात रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.