कोरोनाबाबत तालुक्याला बऱ्यापैकी दिलासा मिळत असला तरी तालुका ‘कोरोना’ मुक्त झाला नसल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. एक रूग्ण निघाल्याने ही महामारी तालुक्यातून हद्दपार झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
वेग मंदावल्याने नागरिक एकदम बेफिकीरपणे वागत आहेत. सुरक्षित अंतर तर सोडाच परंतु, साधा मास्कसुद्धा गर्दीत असताना दिसत नाही. सध्या सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. बाजार पूर्वपदावर आलेला आहे. दुकानात खरेदी विक्री सरळ मार्गे सुरू आहे. एकंदरीत कोरोना संदर्भाने सर्वच गाफील असल्याचे चित्र दिसत असले तरी मी गेलो नाही असा गर्भित इशारा ‘कोरोना’ ने मंगळवारी दिला आहे .
तालुक्यात अजूनही एखादा ‘कोरोना’ बाधित रुग्ण निघत असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. किमान गर्दीत जाणे टाळावे तसेच गरज भासली तर मास्कशिवाय जाऊ नये ,सुरक्षित अंतर ठेवावे ,‘कोरोना’ प्रतिबंधासाठीच्या नियमावलीचा विसर पडू देऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी यांनी केले आहे.