‘कोरोना’ कारणे बाजार बंद; बाजार ओट्यावर सन्नाटा
मावशी ! घ्यायची का कोबी, फ्लॉवर, गाजर
फिरते किरकोळ विक्रेते करतात नाराजी व्यक्त
शिरूर कासार : जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी नगर पंचायतीने केली. पोलिसाची गाडी फिरत होती. पर्यायाने सोमवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याने बाजारात सन्नाटा दिसून येत होता. तसेच जनावरांच्या बाजारातही एकही पशुधन विक्रीसाठी आले नव्हते. या बाजार बंदच्या कारवाईमुळे फिरते किरकोळ व्यापारी यांच्या रोजीरोटीवर गदा आल्याने मोठी नाराजी व्यक्त होत होती.
जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांचा आकडा वाढत असून तालुक्यात देखील असे रुग्ण निष्पन्न होत आहेत. गर्दीवर निर्बंध घालण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी बाजार बंदीचा हुकूम जारी केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगर पंचायतीने जनजागृती करत बाजार बंद असल्याचे ऐलान केले. परिणामी, बाजार दिवस असूनदेखील ओटे ओसाड पडलेले होते, तर जनावरांच्या बाजारात देखील शुकशुकाट दिसून येत होता.
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस गाडी फिरत होती. कोरोना आणि कारवाई नको म्हणून सोमवारी बाजारात भाजी विक्रेते, कापड विक्रेते, पादत्राणे विक्रेते, असे एक ना अनेक फिरते किरकोळ व्यापारी आलेच नाहीत. भाजी बाजार बंद असल्याने डोक्यावर पाटी घेऊन घ्यायची का कोबी, गाजर, वांगी अशी हाकाटी पिटत गल्लोगल्ली फिरून भाजी विकण्यासाठी पायपीट करत होते.
सोमवारच्या बाजारावर अनेकांचा आठवडा अवलंबून असतो; परंतु आता बाजारच बंद असल्याने त्यांना आठवडाभराच्या रोजीरोटीची विवंचना भासणार असल्याने या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शिरूरसह अन्य बाजारांत दुकान मांडत असतो. होणारी विक्री आम्हाला आधारभूत ठरत असते. मात्र, आता बाजारच बंद असल्याने आम्ही काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, मजूर यांचा सरकार काहीअंशी तरी विचार करते. मात्र, आम्हा फिरत्या बाजार व्यापाऱ्याची कोणी दखल घेत नसल्याची खंत जाणू खामकर यांनी व्यक्त केली.
===Photopath===
080321\img20210308104457_14.jpg