गेवराई : तालुक्यातील गंगावाडी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेला जवळपास ५५ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने तालुक्यातील गंगावाडी येथे शनिवारी कारवाई केली. दरम्यान, जप्त केलेला वाळूसाठा या महसूल पथकाने रात्र जागून काढत शहरातील विश्रामगृह परिसरात हलविला.
गोदावरी नदीतील पाणी कमी होऊ लागताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू केला आहे. नदीपात्रातून केनीच्या साहाय्याने वाळू उपसा करून ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. तालुक्यातील गंगावाडी येथे गोदावरी नदीपात्रातून अशाच प्रकारे वाळू उपसा करून तो साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार जाधवर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी गंगावाडी येथे छापा टाकला. तेथे अवैधरीत्या साठा केलेली जवळपास ५५ ब्रास वाळू जप्त केली. याची किंमत चार लाख रुपये आहे. ही कारवाई नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधिकारी माने, तलाठी गायकवाड, सोन्नर, पगारे, पखाले, कोतवाल कुंदन काळे, आदींनी केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.