अंबाजोगाई :
अंबाजोगाई शहरातून पोखरीमार्गे लातूर महामार्गास जोडणाऱ्या रस्त्याची दैना लवकरच फिटणार असून येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.
अंबाजोगाई शहरातील तथागत चौकातून पोखरी मार्गे लातूर राज्य महामार्गाला जोडणारा पोखरी रस्ता हा अनेक वर्षांपासून खराब झाला होता. या रस्त्याच्या विस्तारीकरण आणि मजबुतीकरणाचा प्रस्ताव ही अनेक वर्षांपूर्वी दाखल करण्यात आला होता. अंबाजोगाई शहरापासून साधारणपणे आठ किलोमीटर अंतराचा हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेत वर्षभरापूर्वी समाविष्ट करण्यात आला होता. या योजनेसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचे बजेटही मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत टाकण्यात आले होते. या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या सततच्या ये-जामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती. अंबाजोगाई शहरालगतच्या पोखरी रस्त्यावरील नवीन वसाहतींना वरदान ठरणारा हा रस्ता गेली वर्षभरापासून राजकीय ओढाताणीत गुरफटला होता. अखेर या रस्त्याचे काम काँग्रेस पक्षाच्या एका राजकीय नेत्याचा भाऊ करणार असल्याचे समजते. गेली अनेक वर्षे रखडलेला हा रस्ता टकाटक होण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झाला असून, या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
नव्या एजन्सीला कामाचे हस्तांतरण
गतवर्षी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध प्रलंबित रस्त्यांचा या योजनेत समावेश करून २३० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली होती. या कामांमध्ये अंबाजोगाई-पोखरी-सेल
अंबा फाटा या ८ किमी. लांबीच्या रस्त्याच्या कामाचा समावेश होता. अंबाजोगाई पोखरी सेलूअंबा फाटा या रस्त्याचे काम एका एजन्सीला सुटले होते. मात्र, या कामाच्या मंजुरीचा टोल संबंधित कार्यकारी अभियंत्यांना न पोहोचल्यामुळे या कामाची वर्कऑर्डर आजपर्यंत प्रत्यक्षात निघू शकली नव्हती. मात्र, आता हे काम नव्या एजन्सीला हस्तांतरित करण्यात आले असल्यामुळे त्याने टोल प्रक्रिया पूर्ण केली असून, या कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
रस्त्यालगतच्या जमिनीला सोन्याचे भाव
अंबाजोगाई-पोखरी-सेलूअंबा हा रस्ता टकाटक होणे हा अंबाजोगाई शहरातल्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. अंबाजोगाई शहरालगत पोखरी रस्त्यालगत अनेक व्यावसायिकांनी मोठ्या जमिनी येथे प्लाॅटिंगच्या व्यवसायासाठी घेऊन ठेवलेल्या आहेत. आज या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. हा रस्ता झालाच तर या विभागातील प्लॉटचे भाव गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाहीत. या रस्त्याच्या दुतर्फा अंबाजोगाई शहरातील बड्या लोकांच्या शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी त्यांना हा रस्ता आहे. शिवाय या रस्त्याच्या दुतर्फा शहरालगतच्या नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. त्यामुळे या रस्त्याला मोठे महत्त्व आले आहे.