अविनाश मुडेगांवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई हे मध्यवर्ती बसस्थानक असून, लांबपल्ल्याच्या व ग्रामीण भागात जाणाऱ्या जवळपास २००पेक्षा जास्त फेऱ्या अंबाजोगाई बसस्थानकातून सुटतात. प्रवाशांची मोठी संख्या असणाऱ्या या बसस्थानकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. येथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
अंबाजोगाई बसस्थानकातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर अशा लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. या बसस्थानकातून दररोज १२२ फेऱ्या होतात तर किमान दोन हजारांपेक्षा जास्त प्रवासी बसस्थानकातून प्रवास करतात. अंबाजोगाई बसस्थानकाची इमारत ही ५० वर्ष जुनी असून, या इमारतीच्या डागडुजीचे व नवीन विस्तारीत काम कंत्राटदराला देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराने हा परिसर उकरून ठेवल्याने सध्या बसस्थानकात धुळीचे साम्राज्य आहे. बसस्थानकातील रस्ते पूर्णत: उखडले असून, बस स्थानकात येताच मोठ्या प्रमाणात धूळ उडते. या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
अंबाजोगाई बसस्थानकात बांधण्यात आलेले शौचालय हे एका बाजूला आहे. तसेच येथील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. परिणामी प्रवासी येथील भिंतीचाच वापर लघुशंकेसाठी करतात. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. दैनंदिन सफाई व्यवस्थित होत नसल्याने सर्वत्र घाण साठली आहे. बसस्थानकात कचऱ्याचे ढिगारे साठले असून, त्यावर मोकाट जनावरे ताव मारत आहेत. सध्या अंबाजोगाई बसस्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बस जिथे जागा मिळेल तिथे लावल्या जातात. त्यामुळे प्रवाशांवर गाडी शोधण्याची वेळ येते. ज्या पायाभूत सुविधा प्रवाशांना देणे गरजेचे आहे, त्या सुविधाही या स्थानकात उपलब्ध नाहीत.
अंबाजोगाई बसस्थानकाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल व त्यानंतर बसस्थानकाचे स्वरूप पालटेल. या बसस्थानकात प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- नवनाथ चौरे (आगारप्रमुख, अंबाजोगाई).
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
अंबाजोगाई बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, बसस्थानकातील अस्वच्छता, उडणारी धूळ याचा सामना प्रवाशांना करावा लागतो. सामान्य प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसस्थानकात उपलब्ध व्हावी. दैनंदिन स्वच्छताही झाली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
- रणजित डांगे (प्रवासी)
अंबाजोगाई बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे. पुरुषांचे व महिलांचे स्वच्छतागृह जवळजवळ असल्याने बहुतांश महिला तिकडे जाणे टाळतात. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे.
- राणी गायकवाड (प्रवासी)