चुकीचा पत्ता, नंबरचा घोळ
अंबाजोगाई : अंबाजोगाईत व परिसरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. मात्र, अजूनही कोरोनाबाबत गैरसमज व पसरलेल्या अफवांमुळे कोरोनाच्या तपासणीसाठी ग्रामीण भागातील मंडळी धजावत नाहीत. त्यातच चुकीची माहिती व चुकीचा नंबर दिल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेताना आरोग्य विभागाची मोठी अडचण झाली आहे. कोरोना संसर्गापेक्षा तपासणीचाच धसका ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे.
अंबाजोगाई शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्याजवळ पोहोचली आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी अंबाजोगाईत येतात. या बाधित रुग्णांवर उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्यावतीने घेतला जातो. तालुक्यातील बर्दापूर, घाटनांदूर व परिसरातील अनेक गावांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गावातील व्यक्तींनी कोरोना रुग्णांबाबत व संशयित रुग्णांची खरी माहिती आरोग्य विभागाला दिली तर संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. याची जनजागृती ग्रामस्थांमध्ये होणे गरजेचे आहे.
असाही अडथळा
अनेक व्यक्ती संपर्कात आलेल्यांची माहिती दडवतात. तसेच व्यक्तींची नावे सांगत नाहीत. यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. जे कोणी संपर्कात आले ती व्यक्ती तपासणीचा धसका घेऊन चुकीचा पत्ता अथवा चुकीचा नंबर देऊ लागल्याने याचा मोठा त्रास आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेसिंगसाठी होऊ लागला आहे.
तपासणीचा धसका घेऊ नका
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या तपासणीबाबत धसका घेऊ नये. कोरोनाची तपासणी ही अत्यंत साध्या पद्धतीने होते. अँटिजेन टेस्ट व आर्टिफिशियल टेस्टची सुविधा अंबाजोगाईच्या नागरी रुग्णालय मंडी बाजार येथे सुरू आहे. सहवासात आलेल्या व्यक्तींच्या टेस्ट घेण्याचे काम इथे सुरू आहे. १० मिनिटांमध्ये तपासणी पूर्ण होऊन रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याची माहिती मिळते. जर रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार सुरू होतात. जे निगेटिव्ह आहेत. त्यांना काही त्रास जाणवत असेल तर त्यांच्यावरही औषधोपचार करून तत्काळ घरी पाठवले जाते. त्यामुळे तपासणीबाबत कुणीही भीती बाळगू नये. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.