हातगाडे रस्त्यावर; वाहतुकीला त्रास
अंबाजोगाई : शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता, हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
अनुदानासाठी निराधारांची गर्दी
धारूर : येथे तहसील कार्यालयातून निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या असतात. गर्दीमुळे निराधारांना ताटकळावे लागत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला फटका बसत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विजेअभावी अनेक कामे खोळंबली जात आहेत.
मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहन कोंडी होत आहे. तसेच गुरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहनधारकांना रस्ताही राहत नसल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. मोकाट जनावरांना आवर घालण्याची गरज आहे.