बीड : ‘आंतरराष्ट्रीय योग’ दिनानिमित्त शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संस्थांच्यावतीने योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात योगाचे आयोजन करण्यात आले होते. योगाभ्यास हा सर्वांसाठी महत्त्वाचा असून, दररोज सर्वांनी योगाभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक, आर. राजा, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी किरण वाघ, जिल्हा योग असोसिएशनचे योगगुरू विनायक वझे , विकास गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, जगाला भारताने योग दिनाची देणगी दिली आहे. २०१६ मध्ये जागतिक स्तरावर योग दिनाची सुरुवात झाली . प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज योग अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर खंड पडला असेल तर आजच्या दिवसापासून तो सुरू करावा आणि नियमित केला जावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी उपस्थितांना प्रत्येक आसनाचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येक प्रकाराचे प्रात्यक्षिक करून योग गुरु यांनी उपस्थितांना प्रातिनिधीक स्वरूपात योगासने करावयास सांगितली. यामध्ये प्राणायाम, कपालभाती, शितली या योगासनांचे सद्यस्थितीत असलेले महत्त्व देखील समजावून सांगितले. त्याचबरोबर वज्रासन, त्यातील विविध प्रकार तसेच दंडासन, भद्रासन आदी विविध प्रकारची योगासने करत उपस्थितांचा योग अभ्यास केला. योग अभ्यासाचा शेवट प्रार्थना पठणाने झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, तहसीलदार शिरीष वमने, जिल्हाधिकारी कार्यालयातील गिरीश मोहेकर, शिवशंकर मुंडे-पाटील यांनी योगाभ्यास केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद विद्यागर यांनी केले. आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योगेश आवढाळ, रमाकांत डिंगणे, ज्ञानेश्वर धंडारे, सचिन जाधव, किशोर काळे यांनी यांनी परिश्रम घेतले.