गेवराई : गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब जनतेच्या प्रश्नांवर जनसुनवाई घेऊन काँग्रेस पक्षाचा १३६वा स्थापना दिवस यशराज नगर येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे, जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे, सोनाजी कारके, शेषराव सदाफुले, संगीता हतागळे, शेख मुसा, महादेव रोकडे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष तुकाराम खरात, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण आजबकर, बळीराम गिराम, जीजा जगताप, राहुल घेणे इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी सोनाजी कारके यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी ॲड. बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात इतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ठणकावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गरिबांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला, पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन शेषराव सदाफुले यांनी केले.