माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावरील घटना
जातेगाव : उसाने भरून चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार घुसल्याने कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाले असून अन्य तीन जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजता भेंड खुर्दनजीक माजलगाव-पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर घडली. तर सिरसदेवी परिसरात झालेल्या अन्य एका अपघातात उभ्या ट्रेलरला दुचाकी धडकल्याने एक इसम ठार झाला. बनवस (जिल्हा परभणी) येथील कुटुंब नातलगाच्या विवाह सोहळ्याला औरंगाबाद येथे (एम. एच. २४ व्ही- ९२५७) कारने निघाले होते. बुधवारी मध्यरात्री दीड वाजतादरम्यान गेवराई तालुक्यातील उसाने भरून चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार घुसली. या अपघातात कारमधील व्यकंट विश्वनाथ बल्लोरे (६०) आणि सुलोचना व्यंकट बल्लोरे (५०) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. जखमींमध्ये अहिल्याबाई बापुराव बल्लोरे, प्रताप अंकुश नळगिरे आणि एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना पुढील उपचारार्थ बीड येथे हलविण्यात आले तर अपघातात ठार झालेले पती-पत्नी यांचे मृतदेह जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
आणखी एक अपघात, एक ठार
सिरसदेवी परिसरात उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना रात्री १० वाजता घडली. घटनास्थळाचा पंचनामा तलवाडा ठाण्याचे पोलीस कर्मचारी भोले यांनी केला.