लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल करताच शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात सुसाट धावणारे, नियमांचे उल्लंघन करणारे तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकीस्वारांनी तर उच्छाद मांडला आहे. वाहतूक पोलीस सिग्नल तोडणे, नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावणारे, हेल्मेट न वापणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, कानाला त्रास होईल असा हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकीस्वारांवर केल्या गेलेल्या कारवाया कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाहीत का रे भाऊ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
प्रदूषण थांवबिण्यासाठी विविध उपाययोजना शासन व प्रशासन स्तरावर केल्या जातात. यामध्ये जलप्रदूषण, हवा प्रदूषण यावर सर्वाधिक भर दिलेला असतो. मात्र, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात शहरी भागात होत आहे. तरी देखील प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, प्रार्थनास्थळ, न्यायालयासह इतर काही महत्त्वाच्या ठिकाणच्या परिसरात हॉर्न वाजविण्यास बंदी घातलेली असते. मात्र, तरी देखील काही टवाळखोर दुचाकीस्वारांकडून नागरिकांच्या कानाला त्रास होईल अशा पद्धतीने हॉर्न वाजवत गाडी भरधाव वेगात चालवली जाते. त्याचसोबत बुलेटची क्रेज तरुणांमध्ये वाढली आहे. तिच्या सायलन्सरमधूनदेखील आवाज काढला जातो. विशेष म्हणजे कायद्याने कारवाई करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे परवानगी नसताना आवाज करणारी बुलेट आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
...
फॅन्सी हॉर्नची फॅशन
भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांची युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात क्रेज आहे. या महागड्या गाड्या पालकांकडून खरेदी केल्यानंतर रस्त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न बसवून घेतात. तसेच महाविद्यालयात, क्लासेसच्या परिसरात ही टवाळखोर मंडळी जास्त मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवतात. त्यांच्यावर पोलिसांकडून जुजबी कारवाई देखील होते.
....
कर्णकर्कश हॉर्न वाजवाल तर....
कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यानंतर विविध कलमान्वये दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे. यात केंद्र शासन, राज्य शासनाचा स्वतंत्र कायदा आहे.
सायलेंट झोनमध्ये हॉर्न वाजविल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. त्याशिवाय मल्टीपल प्रमाणात हॉर्न वाजविल्यास दंडाची रक्कम ५०० रुपयांपर्यंतही वाढविण्यात येऊ शकते, अशी माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
...
कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो
कानामध्ये बाह्य कर्ण, आंतरकर्णामध्ये विशिष्ट प्रकारच्या विविध पेशी असतात. त्याला एअर सेल म्हणतात. त्या एअर सेलला या कर्णकर्कश आवाजामुळे हानी पोहोचत असते. काही वेळी ही हानी तात्पुरत्या स्वरुपात असते. मात्र, सतत कानावर असे आवाज पडले तर कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
....
गाडी पकडल्यास कारवाई होतेच
कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या गाड्या चालविणारे पोलीस दिसल्यानंतर अशी कृती करीत नाहीत. त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नाही. मात्र, तसा कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून हॉर्न काढून टाकण्यात येतो. तसेच दंडात्मक कारवाई देखील केली जाते. दरम्यान, अशाप्रकारे कोणी मुद्दामहून हॉर्न वाजवत गल्लीमधून फिरत आहे, अशी तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली तर संबंधितावर पाळत ठेवून कारवाई देखील केली जाईल.
-कैलास भारती, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखाप्रमुख.
...