: शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. क्षतिग्रस्त झालेल्या शहरांतर्गत कानडी व उमरी रस्ता दुरुस्तीचे काम संबंधित विभागाने येत्या आठ दिवसांत हाती घेऊन पूर्ण न केल्यास २ मार्च रोजी महामार्गावरील बीड-अंबाजोगाई रस्त्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे.
केज शहरातील रस्त्यांची समस्या २० वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरातील समतानगर, शिक्षक कॉलनीसह, धारूर रोडलगतचा भाग, बीड रोड व कळंब रोडलगतच्या नवीन विस्तारित भागात रस्त्याची समस्या कायम आहे. याशिवाय, शहरातील प्रमुख रस्ते म्हणून ओळखल्या जाणा-या शहरांतर्गत भागात कानडी रस्ता, उमरी रस्ता व मंगळवार पेठ रस्ता इत्यादी रस्ते विकासापासून वंचित आहेत. यासाठी केज विकास संघर्ष समितीने संबंधित विभागाकडे विविध आंदोलने व उपोषणांद्वारे सतत पाठपुरावा केलेला आहे. उमरी व कानडी रस्त्यांबाबत प्रत्येक वेळी प्रशासन बेफिकीर राहिले आहे. वरील रस्त्याच्या नादुरुस्त व वाईट अवस्थेमुळे नागरिकांना मणक्यांचे व इतर आजार जडले आहेत. यासाठी येत्या आठ दिवसांत कार्यवाही सुरू न केल्यास पुन्हा एकदा या भागातील नागरिकांच्या सहभागाने २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बीड-अंबाजोगाई महामार्गावर बेमुदत आंदोलनाचा इशारा केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांच्यासह नासेर मुंडे, महेश जाजू, रूपेश शिंदे, मुकुंद डांगे आदींनी दिला आहे.