कडा : रेल्वे उड्डाणपुलाची गरज असताना तब्बल दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता केला आणि या वळण रस्त्याला काटकोनाने जोडले, त्यामुळे रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने एका महिन्यात या रस्त्याने प्रवास करणारे तब्बल पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी सरपंच अनिल ढोबळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
औरंगाबाद, पैठण, शेवगाव, पाथर्डी, धामणगाव या भागातून येणाऱ्या वाहनांना कडा येथे भगिनी निवेदिता शाळेजवळ रेल्वे क्रॉसिंग लागते . त्यामुळे तिथे उड्डाण पूल करण्याऐवजी वळण रस्ता करण्यात आला आहे . शंभर ते दीडशे मीटर लांबीचा उड्डाण पूल शक्य असताना चक्क दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता काढण्यात आला आहे . हा वळण रस्ता काटकोनात असल्याने पाथर्डीकडून येणाऱ्या वाहनांना वळण रस्त्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे रेल्वेने रस्ता अडवण्यासाठी टाकलेल्या ढिगाऱ्यावर रात्रीच्या वेळी वाहने आदळतात. अशा प्रकारे झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक करण्याची तसेच वळण रस्ता असल्याचा फलक लावण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे . या ठिकाणी त्वरित उड्डाणपूल तयार करण्यासाठी सरपंच अनिल ढोबळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून, त्यास लवकरच यश येणार असल्याचे समजते.