बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे या बहीण-भावातील राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल, असे वाटले होते; परंतु ऐनवेळी पंकजा मुंडेंनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत राजकीय स्पर्धेतील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या पूर्वसंध्येला बहिष्काराची खेळी खेळत वर्चस्वाबाबत झाकली मूठ सव्वालाखाची करण्याचा प्रयत्न केला. १९ पैकी ८ जागांसाठी होणाऱ्या मतदानाला तसे फारसे महत्त्व नसले तरी उर्वरित जागा चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणून विरोधकांनी कसा रडीचा डाव खेळला, हे ठासून जगाला पंकजांना सांगता आले असते.
या बँकेच्या १९ जागांसाठी निवडणूक लागली होती. सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज फेटाळल्याने उर्वरित आठ जागांसाठी मतदान होणार होते. या आठ जागांमुळे गणपूर्तीची अट पूर्ण होणार नसल्याने तसे या निवडणुकीला फारसे महत्त्व उरले नसले तरी बँकेवर कुणाचे वर्चस्व आहे, मतदार कुणाच्या बाजूने आहेत, हे दाखविण्याची संधी पंकजा मुंडे आणि भाजपला होती. पंकजा यांच्या मते पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खराच रडीचा डाव खेळला असता तर मतदारांनी हे सत्याच्या बाजूने मतदान केले असते. १३८२ मतदान असलेल्या या बँकेवर आमचे वर्चस्व आहे, चांगला कारभार करून बँक तोट्यातून नफ्यात आणली, विरोधकांनी बँक तोट्यात आणली, असे पंकजा वारंवार सांगत आहेत. या मतदानाच्या निमित्ताने सर्व दावे मतदारांनी उघड केले असते.
ज्या मतदानातून काही निष्पन्नच होत नाही, प्रशासक येणार हे दिसत असताना राजकीय शक्तीची परीक्षा कशाला करायची असे कदाचित पंकजा यांना वाटले असावे. याउलट पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक सर्व ताकदीने लढणार असल्याचे अतिशय आत्मविश्वासाने जाहीर केले होते. तशी त्यांनी विजयासाठी ‘फिल्डिंग’ही लावली होती. गेलेली सत्ता आपण कशी सहज आणू शकतो, हे धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी पंकजा यांना दाखवून दिले होते.
मागच्या बँकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपची राज्यात सत्ता होती. जिल्ह्यातील सर्वच आमदार बाजूने होते. त्यामुळे पंकजा यांच्या ताब्यात एकतर्फी बँक आली. यावेळी सत्ता नव्हती आणि मागच्या सारखा नेतेमंडळीतील एकसंघपणाही दिसला नाही. बहिष्काराचा तसा फारसा परिणाम दिसला नाही. मतदानाची टक्केवारी कमी झाली. अपेक्षेप्रमाणे गेवराई, माजलगावमध्ये अमरसिंह पंडित, आ. प्रकाश सोळंके यांनी मतदान करवून घेतले. जिल्ह्यात एकूण ५८ टक्के मतदान झाले. याचा अर्थ निम्म्यापेक्षा जास्त मतदारांनी बहिष्काराचा आदेश झुगारला असा होतो. आ. सुरेश धसांच्या आष्टीमध्ये, राजाभाऊ मुंडेंच्या वडवणी तालुक्यात कमी म्हणजे ३३ टक्के मतदान झाले. इथे भाजपचे वर्चस्व आहे. इतर तालुक्यांत सरासरी ५० टक्के मतदान झाले, याचा अर्थ मतमोजणीनंतर कळेल. काही का असेना विजय असो की पराभव, बहिष्कारामुळे निकालातील हवाच निघाली, असेच म्हणावे लागेल.
===Photopath===
200321\202_bed_22_20032021_14.jpg~200321\202_bed_21_20032021_14.jpg
===Caption===
पंकजा मुंडे~धनंजय मुंडे