आष्टी : शहरातील महात्मा फुले चौकातील सुखकर्ता अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब शिरसाट (वय ४५) यांचा मृतदेह शहरालगतच्या मुर्शदपूर येथील धनवडे वस्तीनजीकच्या शेतविहिरीत आढळून आला. १० एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर आष्टी शहरात खळबळ उडाली. आष्टी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून काढून घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस सखोल तपास करत आहेत.
बाळासाहेब शिरसाट शहरातील सुखकर्ता अर्बन बँकेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह धनवडे वस्तीजवळील एका विहिरीत आढळून आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा मृतदेह दिसून आल्यानंतर शेतकऱ्याच्या खबरेवरून आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस उपनिरीक्षक कोरडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. विहिरीमध्ये फार काही पाणी नसल्याचे दिसून आले.
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला; पंरतु गळ्याला कंबर पट्टा आवळला होता. चेहऱ्याजवळ काही जखमा होत्या. त्यामुळे डॉ. पाटी,ल डॉ. राहुल टेकाडे, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचे नमूद केल्यानंतर मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
फोटो : आष्टी येथील सुखकर्ता अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब शिरसाट यांचा मृतदेह मुर्शदपूरजवळ धनवडे वस्तीमधील एका विहिरीत आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
इन्सेट बाळासाहेब शिरसाट
===Photopath===
100421\img-20210410-wa0358_14.jpg~100421\img-20210410-wa0314_14.jpg