परळी : तालुक्यातील रामेवाडी येथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे तुकाराम कुकडे यांच्या ३०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूच्या आजाराने शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे या भागातील ११ गाव व तांडे येथे पुढील आदेश येईपर्यंत कुक्कट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक व बाजार करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी एका आदेशाद्वारे प्रतिबंध घातला आहे.
मंगळवारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड डॉ. रवि सुरेवाड, सहाय्यक आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर तांदळे, परळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश आघाव, डॉ. कृष्णा कोळी, अशोक फड, डॉ. विठ्ठल मुंडे व ढमढेरे, सुतार, शिंदे, सूर्यवंशी यांच्या पथकाने रामेवाडी, जळगव्हाण व जळगव्हाण तांडा येथे भेट देऊन १७५ कोंबड्यांची पिले, २०५ कोंबडे, २९१ अंडी व पशुखाद्य नष्ट केले. या तीन पथकातील १५ कर्मचाऱ्यांनी प्रथम स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. पीपीइ कीट घालून ही कार्यवाही केली. दरम्यान, या प्रकारामुळे कोणीही घाबरून जाऊ नये ,काळजी घ्यावी, असे आवाहन परळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश आघाव यांनी केले आहे.
परळी तालुक्यातील रामेवाडी शिवारात ३०० कोंबड्या ह्या बर्ड फ्लूच्या आजाराने मृत्यू पावल्याचा अहवाल सोमवारी रात्री भोपाळ येथील प्रयोग शाळेतून प्राप्त झाला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रामेवाडी गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच रामेवाडीपासून एक किलोमीटर अंतरावरील रामेवाडी जळगव्हाण, जळगव्हाण तांडा, गोवर्धन, हिवरा, पिंपरी, तेलसमुख, बोरखेड ममदापूर, कोडगाव हुडा, कौडगाव तांडा येथे पुढील आदेश येईपर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.
===Photopath===
230221\img-20210223-wa0413_14.jpg