कडा येथील पुलाच्या दुरुस्तीची गरज
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाचे कठडे तुटले असून रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
विद्युत पंपांची चोरी वाढली
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
गतिरोधकाचे सूचना फलक गायब
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच मंगल कार्यालये आहेत. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचना फलकही गायब आहेत. अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत तसेच सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासकीय कार्यालयाभोवती गाजर गवताचा वेढा
अंबाजोगाई : शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छतेकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. परिसराची स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचारी तसेच नागरिकांतून होत आहे.