७० शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा प्रश्न रखडला
गेवराई जि. बीड : तालुक्यातील बेलगुडवाडी येथील ६० ते ७० शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून महिला व मुलाबाळांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक ८६ मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचा ऊस या रस्त्यामुळे उभा असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. परंतु प्रशासनाकडून याचीही दखल न घेतल्याने सोमवारी येथील सर्व ग्रामस्थांनी महिला व मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आमच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी श्रीराम पवार,ऋषिकेश पवार,रणजित पवार, शरद पवार, अंगत पवार, एकनाथ पवार, भागवत पवार, पप्पू पवार, मंजुळा पवार, भागूबाई पवार, शांता पवार, किस्किंदा पवार, सारस्वती पवार सह महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.