बीड : कोरोनाची लस येऊ घातल्याने आता आरोग्य विभागाकडून रंगीत तालीम हाती घेण्यात येत आहे. शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालय, परळी उपजिल्हा रुग्णालय आणि वडवणी आरोग्य केंद्रात ही तालीम ३ तास घेतली जाणार आहे. यासाठी ७५ आरोग्यकर्मींची निवड करण्यात आली आहे.
देशात कोरोनाच्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता मिळाली आहे. याच अनुषंगाने मराठवाड्यातील जालना व इतर जिल्ह्यांत लस देण्याबाबत रंगीत तालीमही घेण्यात आली. आता जिल्हास्तरावरही ही लस उपलब्ध होणार असून, त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. बुधवारी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली असून, आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारी बीड जिल्ह्यात याची रंगीत तालीम होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालय, परळी उपजिल्हा रुग्णालय व वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी २५ जणांना घेऊन लसीकरणाची तालीम केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम हे गुरुवारी सर्व केंद्रांना भेटी देणार आहेत.
असे असेल केंद्रांवर नियोजन
एका केंद्रावर त्याच आरोग्य संस्थेतील २५ लाभार्थी, १ लस देणारा, १ शिक्षक, १ पोलीस कर्मचारी, १ आशाताई, १ अंगणवाडी सेविका असणार आहे. सकाळी ९ ते १२ असे तीन तास ही तालीम चालेल. वेटिंग रूम, लसीकरण रूम, नोंदणी रूम, दक्षता रूम, असे नियोजनही केले जाणार आहे.
कोट
लसीकरणाची रंगीत तालीम शुक्रवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत बीड जिल्हा रुग्णालय, परळी उपजिल्हा रुग्णालय आणि वडवणी प्रा.आ. केंद्रात होणार आहे. याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. गुरुवारी याचे नियोजन करण्यासाठी केंद्रांना भेटी देणार आहोत.
डॉ. संजय कदम
नोडल ऑफिसर, लसीकरण मोहीम, बीड