अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकांमध्ये पैसे भरणे, काढणे व बँकेच्या कामास नागरिकांची गर्दी होत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे. कोरोना नियमांचे पालन दोन्ही बाजूंनी होत नसल्याचे दिसून येते.
....
पशुखाद्य महागल्याने शेतकऱ्यांची अडचण
अंबाजोगाई : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे. किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. पशुखाद्याच्या किमती शासनाने कमी कराव्यात, अशी मागणी शामराव मठपती यांनी केली आहे.
-------------------------
बियाणे अनुदान वाढविण्याची मागणी
अंबाजोगाई : शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देऊनही भाववाढीमुळे बियाणे खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे. आधीच शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शासनाने अनुदानित बियाणे देण्याची मागणी मुडेगावचे सरपंच विलास जगताप यांनी केली आहे.
------------------------
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करावी
अंबाजोगाई : कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी अंबाजोगाई व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला. आता पुन्हा कोरोना फोफावत असून त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
-------------------------
पोलीस शिपाई भरतीची प्रतीक्षा
अंबाजोगाई : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्ष करण्यात यावी, अशी मागणी तयारी करीत असलेल्या बेरोजगार तरुणांनी केली आहे.