बीड : जिल्हा रुग्णालयातील आयसीयु एकमध्ये दाखल असलेल्या गंभीर रुग्णांवर आता तज्ज्ञांद्वारे उपचार केले जात आहे. यासाठी बीडमधील फिजिशियन व नर्स या बंगळूरच्या डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. यासाठी ९ खाटांवर मॉनिटर आणि कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. याला मंगळवारपासून सुरुवातही झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रुग्णांना गतीने उपचार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आठवड्यापूर्वीच वॉर्ड क्रमांक ५ आणि ६ मध्ये ५० खाटांवर मॉनिटर बसविले. यामुळे अधिकाऱ्यांना बसल्या जागी गंभीर रुग्णाची माहिती समजत आहे. हे कार्यान्वित केल्यानंतर आता टेली मेडिसीन सुविधा आयसीयू एकमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. ९ खाटांवर कॅमेरे आणि मॉनिटर बसविले आहेत. जे रुग्ण अतिगंभीर आहेत, अशांवर काय उपचार करायचे, याची माहिती थेट क्लाऊड फिजिशियन या ॲपद्वारे बंगळूरच्या डॉक्टरांना सांगितली जाणार आहे. येथून फिजिशियन, आयसीयू तज्ज्ञ, कोविड स्पेशालिस्ट हे येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांचीही कॅमेऱ्याद्वारे नजर राहणार आहे. याबाबत सर्व फिजिशियन आणि नर्सेसला प्रशिक्षणही देण्यात आल्याचे डॉ. रेवडकर यांनी सांगितले.
डोझी मॉनिटरकडे होतेय दुर्लक्ष
५० खाटांवर डोझी मॉनिटर बसविलेले आहेत. परंतु, संंबंधित वॉर्डमधील नर्स व डॉक्टर कॉम्प्युटर बंद करून बसतात. याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने कोणता रुग्ण गंभीर हे त्यावर दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी याबाबत सर्वांना सक्त सूचनाही केल्या होत्या. परंतु, बुधवारीही याकडे दुर्लक्षच झालेले दिसले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास रुग्णांना फायदा होईल. त्याकडे दुर्लक्ष करु नये, अशी मागणी होत आहे.
रुग्णांना दर्जेदार आणि गतीने उपचार मिळावेत, यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. यात तंत्रज्ञानाचाही आधार घेतला जात आहे. आता टेली मेडिसिनद्वारे बंगळूरचे तज्ज्ञ हे आपल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या आयसीयू १ मधील ९ खाटांवर कॅमेरे आणि मॉनिटर बसविण्यात आले आहेत.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
===Photopath===
030621\03_2_bed_2_03062021_14.jpeg
===Caption===
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी तंत्रज्ञानाची पाहणी केली. यावेळी मेट्रन संगिता दिंडकर उपस्थित होत्या.