अंबाजोगाई : भारतीय संविधानाने दिलेले हक्क मागताना कर्तव्याची जाणीव महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने आयोजित जागर लोकशाहीचा या कार्यक्रमांतर्गत शहरातील सफाई कामगारांच्या सत्काराचे, कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शामसुंदर सोन्नर यांनी भारतीय घटनेविषयी माहिती सांगितली.
भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जनतेवर जबाबदारी दिली आहे. या देशाचे चांगले करण्याची जबाबदारी येथील जनतेची आहे, असे मत सोन्नर महाराज यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी केला. सफाई कामगार स्वच्छतेचे दूत, स्वच्छतेचे सैनिक आहेत. तरुणांमध्ये श्रमाचा संस्कार रुजला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रणव कोडीया यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सफाई कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून सुशीला सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर काही कामगार भगिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्रास्ताविक महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ. शैलजा बरूरे यांनी केले. सफाई कामगारांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सफाई कामगारांचे कार्य सीमेवरील सैनिकांइतके महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. धनाजी आर्य यांनी केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋचा कुलकर्णी हिने देशभक्तीपर गीत सादर केले. तर सानिका कोडीया हिच्या देशभक्तीपर गीत गायनाने व शांतीपाठ सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव एस. के. बेलुरगीकर, संचालिका अंजली गोस्वामी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी, प्राचार्य रमण देशपांडे, उपप्राचार्य डॉ प्रवीण भोसले, उपप्राचार्य डॉ आर. व्ही. कुलकर्णी, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.