माजलगाव : शहरात मागील ३ ते ४ दिवसांपासून दोन केंद्रात व्यापाऱ्यांच्या अँटिजेन टेस्ट सुरू असून या ठिकाणी टेस्ट करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची मात्र मनमानी सुरू आहे. ते कधीही येतात आणि कधीही जात असल्याने व्यापाऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आली. या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून अभय दिला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाने विविध माध्यमातून निर्बंध लादण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांचा विरोध असतांना प्रशासनाने अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक केले होते. अँटिजेन टेस्ट केली तरच दुकाने उघडता येणार असल्याचा दम दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली. व्यापारी व त्यांच्या दुकानावर काम करणाऱ्या मुनिमांची अँटिजेन टेस्ट मागील चार दिवसांपासून सुरू आहे. शहरात मोंढा भागात गणपती मंदिरात एक केंद्र सुरू असून दुसरे केंद्र सोळंके महाविद्यालयात सुरू आहे. गणपती मंदिर येथे अँटिजेन टेस्टसाठी दोन डॉक्टर, दोन परिचारिका, चार लॅब टेक्निशियन,एक फार्मासिस्टची नियुक्ती केली आहे. मात्र, हे कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेत या ठिकाणी न थांबता कधीही येत आहेत व कधीही निघून जात आहेत. यामुळे आपला व्यवसाय सोडून टेस्टसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी डॉ. सुरेश नागरगोजे हे हजर राहत नसल्याने इतर कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप व्यापारी करीत होते.
टेस्ट रिपोर्टसाठीही त्रास
या ठिकाणी टेस्ट करणाऱ्यांचा रिपोर्ट देण्यासाठी फाॅर्म देखील शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांवर या फाॅर्मसाठी इकडे तिकडे फिरण्याची वेळ आली. अँटिजेन टेस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असतांना व्यापाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी करूनही या कर्मचाऱ्यांना अभय दिले जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय नाही
या दोन्ही केंद्रांवर नियुक्त केलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय आरोग्य विभागाकडून करण्यात आली नाही. यामुळे हे डॉक्टर व कर्मचारी येथून निघून जात आहेत. त्यामुळे मागील दोन दिवस तर या कर्मचाऱ्यांची व्यापाऱ्यांनीच जेवणाची सोय केली. आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय न केल्यामुळे व्यापाऱ्यांना विनाकारण आर्थिक फटका बसला.
गणपती मंदिरात सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत .तर हे डॉक्टर व कर्मचारी केव्हाही येत आहेत तर केव्हाही जात असल्याच्यादेखील तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहे. --- डॉ. मधुकर घुबडे , तालुका आरोग्य अधिकारी.
फोटो कॅप्शन
माजलगाव येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांच्या अँटिजेन टेस्ट सुरू असून दुपारी सर्वच डॉक्टर व कर्मचारी निघून गेल्यानंतर सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.
===Photopath===
160321\img_20210316_142822_14.jpg
===Caption===
माजलगाव येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट सुरू असून दुपारी सर्वच डॉक्टर व कर्मचारी निघुन गेल्यानंतर सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.