रिॲलिटी चेक
बीड : जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा रुग्ण व नातेवाइकांना हीन वागणूक देत असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अगोदरच कोरोनाने घाबरलेल्या लोकांना येथील कर्मचारी अरेरावी करत असल्याचे बुधवारी समोर आले आहे. चाचणी करणाऱ्यांना येथील तंत्रज्ञ अरेरावी करतात. शिवाय येथे कसलेही नियोजन नसून महिला, पुरुषांना एकाच रांगेत उभे केले जात आहे. या प्रकाराने आरोग्य विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज ३००पेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्याने जनता घाबरत आहे. तसेच प्रशासनानेही शासकीय, खासगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लक्षणे असणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात नाव नोंदणीसह चाचणी करायला रांगा लागत आहेत. परंतु येथे कसलेच नियोजन दिसत नाही. महिला, पुरुषांना एकाच रांगेत उभे केले जाते. एवढेच नव्हे तर माहिती विचारायला गेल्यावर स्वॅब घेणारे कर्मचारी अरेरावी करीत आहेत. आता प्रतीक्षासह अरेरावीची भाषाही सहन करावी लागत आहे. अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सामान्यांशी चांगला संवाद ठेवण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ज्येष्ठांचे हाल, तरीही दुर्लक्ष
चाचणी करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकही असतात. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. धडधाकट लोकांच्या रांगेत या ज्येष्ठांना तासन्तास उभे केले जाते. त्यांना येथे बसण्याची व्यवस्थाही नाही.
माहिती देण्यासही टाळाटाळ
जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य लोक उपचारासाठी येतात. लक्षणे असणाऱ्यांना येथे कोरोना चाचणी करण्यास सांगितले जाते. परंतु त्यांना येथील माहिती नसल्याने ते विचारपूस करतात. बुधवारीही एका व्यक्तीने नागरगोजे नामक कर्मचाऱ्याला विचारणा केली. यावर त्याने अरेरावी केली. हा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना सांगण्यात आला. त्यांनी विभागप्रमुख डॉ.जयश्री बांगर यांना बोलावून घेत कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यास सांगितले. डॉ. बांगर अर्धा तास तळ ठोकून होत्या.
कोट
मी कोरोना चाचणी करण्यासाठी आलो होतो. माहिती नसल्याने नातेवाइकांना विचारायला पाठविले तर अरेरावी केली. तसेच माहितीही दिली नाही. अगोदरच कोरोनाने घाबरलेलाे होतो. त्यात अशा वागणुकीमुळे आणखीनच भर पडली. अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
गणेश जाधव, सामान्य रुग्ण, बीड
कोट
कोरोनाकाळात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह संवाद चांगला ठेवण्यास सांगितलेले आहे. कामाचा ताण असला तरी भाषा नीट वापरणे आवश्यक आहे. विभाग प्रमुखांना सूचना केल्या आहेत. संंबंधिताची चौकशी करून त्याला कर्तव्यावरून कमी केले जाईल तसेच सामान्यांचे हाल होणार नाहीत यासाठी पत्रे टाकून सावलीही केली आहे. आणखी सुधारणा केल्या जातील.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
===Photopath===
310321\312_bed_18_31032021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणी करण्याच्या ठिकाणी महिला, पुरूषांसाठी एकच रांग असते. शिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही बसण्याची व्यवस्था नसल्याने जमिनीवर बसावे लागते.