अनिल महाजन
धारूर - धारूर तालुक्यातील १४३ अंगणवाड्यांचा सर्व कारभार सुरळीत करण्यासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. मात्र, अनेक वाड्या-तांड्यावर मोबाईलची रेंज नसल्याने ताजा कार्यालयाचा संदेश पाहण्यासाठी, नवीन काहीतरी करण्यासाठी रेंजची शोधाशोध करावी लागते. अनेकवेळा या अंगणवाडीताई मोबाईलमुळे गोंधळूनही जातात. मोबाईलचा उपयोग जेवढा होतो, तेवढीच अडचण होते. यातील अडचणी दूर झाल्या तर अंगणवाडीचा कारभार सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
धारूर तालुक्यातील अंगणवाडीचा सर्व कारभार मोबाईलवर चालावा, यासाठी १४३ अंगणवाड्यांना मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईलवर ११ रजिस्टरचे रेकाॅर्ड अपलोड करण्याची सुविधा करण्यात आली होती. या मोबाईलद्वारे वरिष्ठ कार्यालयाचे संदेश तात्काळ मिळण्याबरोबर त्यांच्याशी संपर्क करणेही सोपे झाले होते. या मोबाईलमध्ये ११ रजिस्टरच्या नोंदीची सोय असून गावातील गरोदर मातांची नोंदणी, किशोरवयीन मुलीची नोंदणी सर्व्हे रजिस्टर, लसीकरण, अंगणवाडी स्टाॕक आदी रजिस्टरमधील अद्ययावत नोंदी या मोबाईलमध्ये ठेवण्याची सुविधा उपलब्ध असून, कारभार सुरळीत करण्यास मोठी मदत होते. मात्र, तालुका डोंगराळ असल्याने दहा ते बारा वाड्या-तांड्यावर कुठल्याच मोबाईला रेंज नसल्याने महत्त्वाचे काम असेल तर अंगणविडीताईना रेंजसाठी शोधाशोध करावी लागते. सिंगनवाडी, जायभायवाडी, पिंपरवडा, रेपेवाडी, पांचीपिंपळ तांडा, व्हरकटवाडी, मोठेवाडी ,सुरानरवाडी, निमला आदी ठिकाणी मोबाईल रेंजची मोठी समस्या आहे. या अडचणींवर मात करून अंगणवाडीताई मोबाईलवर अद्ययावत माहिती ठेवून वरिष्ठ कार्यालयास कसे सहकार्य करता येईल, याच प्रयत्नात असतात.
मोबाईलमुळे कारभार सुरळीत होण्यास मोठी मदत
- बालविकास प्रकल्प अधिकारी कदम धारूर तालुक्यात १४३ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत. मात्र, सर्व अंगणवाड्यांना मोबाईल देऊन कारभार अद्ययावत व सुरळीत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असून अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जाते, असे तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष्मण कदम यांनी सांगितले.
तालुक्यात एकूण अंगणवाडी - १४३
अंगणवाडीसेविका - १३८
मोबाईल वितरण १४३