शिरूर कासार : संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन म्हणजे तुकाराम बीज तर संत एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी या दोन्ही पर्वण्यांच्या वेळी वारकऱ्याला ‘कोरोना’ आडवा आल्याने मुकावे लागले. परिणामी पंढरपूर -पैठण हा पालखी मार्ग ‘भानुदास एकनाथ’ असा गजर नसल्याने मुका होऊन ओशाळल्याचे चित्र दिसून आले. ‘कोरोना’ या महामारीने पारमार्थिक क्षेत्रात सुध्दा दहशत निर्माण केली. त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून शेकडो वर्षांच्या परंपरा नाममात्र स्वरूपात साजऱ्या कराव्या लागत आहेत. नुकताच संत तुकाराम बीज कार्यक्रम झाला. पाठोपाठ षष्ठीला जाणाऱ्या पायी दिंड्यांवरही निर्बंध आल्याने वारकऱ्यांच्या भजनाने गरजणारा पालखी महामार्ग मुका झाला.
खांद्यावर भगवी पताका ,डोक्यावर तुळस ,गळ्यात मृदंग तर हातात टाळ खणखणत मुखाने संतांचे अभंग गात गात घामाच्या धारांची पर्वा न करता चालत जाणारा वारकरी डांबून टाकला गेला. वेदना असह्य असल्या तरी ती देखील ईश्वराचीच इच्छा मानून पैठणचा सोहळा डोळ्यात काल्पनिकदृष्ट्या पाहण्याची वेळ वारकऱ्यांवर आली.
श्रीक्षेत्र भगवानगड,श्रीक्षेत्र नारायणगड ,श्रीक्षेत्र गहिनीनाथगड,श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड या मोठ्या दिंड्या आणि श्रीरंग स्वामी ,भानुदास शास्त्री या तालुक्यातील दिंड्यांशिवाय भाकरे महाराज ,सतीश महाराज ,शुक्लभारती महाराज यांच्यासह अनेक दिंड्यांच्या माध्यमातून हजारो वारकरी ऊन वाऱ्याची पर्वा न करता चालत जातात मात्र यावर्षी भगव्या पताकांना ‘कोरोना’ ने जागाच सोडू दिली नाही.
सिद्धेश्वर संस्थानचे महंत संत आबादेव महाराज यांचेच प्रेरणेने आम्ही शिरूरची राहुटी भागवत महाराज यांच्या फडावर लावत असतो. तिथे शिरूरसह पंचक्रोशीतील वारकरी हक्काने थांबतात. त्यांना पंगत सुध्दा देण्याची आमची चाळीस वर्षांची परंपरा खंडित होत आहे, याचे दुःख वाटते असे लक्ष्मण थोरात यांनी सांगितले.
===Photopath===
010421\img20210401090627_14.jpg