आष्टी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात २६ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या लाॅकडाऊनविरोधात आ. सुरेश धस आक्रमक होऊन व्यापाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. लाॅकडाऊनचा जाहीर निषेध करत आष्टीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुकाने सुरू ठेवली होती. आ. धस यांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर नरमाईची भूमिका घेतली. आष्टी नगर पंचायतमध्ये बंदबाबत प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन २९ मार्चपासून आष्टी तालुक्यात टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन शिथिल करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविल्याचे स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आष्टी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. याबाबत आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाभाऊ कदम यांना २५ मार्च रोजी निवेदन दिले होते. याबाबत आ. धस यांची प्रशासनासोबत शुक्रवारी दुपारी १२ वाजता बैठक झाली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आपल्या मागणीनुसार कोविड-१९ निर्बंध शिथिल करण्याची कार्यवाही २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत जारी केलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे पत्र आ. धस यांना यावेळी देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, डीवायएसपी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे उपस्थित होते.
लाठ्या खायची तयारी
पोलीस बळावर लॉकडाऊन सुरू ठेवायचा असेल तर आमचीही लाठ्या-काठ्या खायची तयारी आहे. आम्हाला १० दिवसांचा लाॅकडाऊन मान्य नाही. लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य भरडला जाईल. जिथे रुग्ण आढळेल तिथे कडक निर्बंध लावा. परंतु, संपूर्ण तालुका लाॅकडाऊन करू नका, अशी भूमिका आ. सुरेश धस यांनी घेतली होती. आष्टी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांची दुकाने ९ ते १ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्या; अन्यथा उद्यापासून सर्वच दुकाने तीन दिवसांसाठी बंद करा. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी चालतील, लाठ्या-काठ्या खाण्याची आमची तयारी असल्याचे आ. सुरेश धस म्हणाले.
===Photopath===
260321\img-20210326-wa0214_14.jpg
===Caption===
लॉकडाऊनच्या विरोधात आ. सुरेश धस व व्यापाऱ्यांची भावना लक्षात घेत शुक्रवारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्याबबत नगर पंचायतच्या वतीने पत्र देण्यात आले.