कडा (ता. आष्टी जि. बीड) गावापासून लांब असलेल्या कुक्कुटपालन शेडमधील १५ कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे घडली. आष्टी तालुक्यातील कोंबड्या मरण्याचे मृत्युसत्र सुरूच असून, निदान होत नसल्याने शेतकरी व कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये धास्ती वाढत चालली आहे.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील अजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीच हजार कोंबड्यांचे शेड आहे. यातील १५ कोंबड्या सोमवारी रात्री अचानक अज्ञात रोगाने दगावल्या. आतापर्यंत तालुक्यात शिरापूर, पिंपरखेड, धानोरा, केरूळ, सराटेवडगांव, खिळद, येथे पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्लूची धास्ती असली, तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अचानक मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अहवाल आल्यावरच समजेल. मंगळवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अरुण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली.
आतापर्यंत पक्षी किंवा कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला नसून, खिळद पाठोपाठ पाटण येथेही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अहवाल येताच निदान समोर येईल, असे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.