धारूर : शहराजवळ असलेल्या घाटरस्त्याचे लवकरच रुंदीकरण व सरळीकरण होणार असून, यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यासोबतच इतर प्रलंबित विकासकामांनाही गती मिळणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धारुर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी खामगाव ते सांगोला रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, शहराजवळच असलेल्या घाटरस्त्याला केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने फाटा देत काम पूर्ण केल्यामुळे हा घाट अपघाताला निमंत्रण ठरत आहे. याबाबत अनेक आंदोलने करत सतत रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न नागरिकांनी लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर आमदार सोळंके यांच्या प्रयत्नातून घाटाच्या रुंदीकरण व सरळीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासोबतच तालुक्यातील नरेगाच्या १,५५९ प्रलंबित कामांसाठी ९६ कोटी ४१ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. तालुक्यातील निराधार योजनेतील मंजूर लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. तहसील पातळीवरील शेतरस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना देत आयुष्यमान भारत योजना गतीने राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार सोळंके यांनी सांगितले. पीएम किसान योजनेचा धारुर तालुक्यातील २५ हजार २०० शेतकरी लाभ घेत असून, उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी गावपातळीवर चावडी वाचन घेण्याची सूचना केल्याचे आमदार सोळंके यांनी सांगितले.