बीड : येथील नगरपालिकेने भिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. यातील ६० लोकांना निवारा केंद्रात ठेवले आहे. त्या सर्वांचे आधारकार्ड काढले आहे. आता यातील ६० वर्षे वय असलेल्या ३० लोकांनाही कोरोना लस दिली जाणार आहे, पालिकेने याबाबत नियोजन केल्याचे सांगण्यात आले आहे.
बीड नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व भिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले होते. यात १८१ लोक आढळले होते. या भिकाऱ्यांना राहण्यासाठी बीड पालिकेने लाखो रुपयांची इमारत उभारली आहे. परंतु, येथे केवळ ६० लोकांचीच क्षमता आहे. इतर भिकारी आजही रस्त्यावर आहेत. जे निवारा केंद्रात आहेत, त्या सर्वांचे पालिकेने आधारकार्ड तयार केले आहेत. या ६० मध्ये ३० पुरुष, २५ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले महिला व पुरुष असे ३० लोक असल्याचे समन्वयक अमोल बडगुजर यांनी सांगितले. आता या लोकांनाही आठवडाभरात लस देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
१२१ भिकारी अद्यापही वाऱ्यावर
पालिकेने भिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यात १८१ लोक आढळले. परंतु, केवळ ६० लोकांनाच निवारा मिळाला. अद्यापही १२१ लोक वाऱ्यावर आहेत. त्यांना निवारा नसल्याने आजही रस्त्यावरच झाेपावे लागत आहे. या लोकांचे आधारकार्डही तयार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे शासनाच्या कोणत्याच योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही, शिवाय कोरोना लसपासूनही वंचित रहावे लागणार आहे.
---
सर्वेक्षणात आढळलेले भिकारी १८१
एकूण निवारा केंद्र १
निवारा केंद्रातील भिकारी ६०
निवारा केंद्रात वास्तव्यास असलेले ३० पुरुष, २५ महिला, ५ लहान मुले