अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात खंड पडू नये म्हणून शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या सहयोगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान सुरू आहे. या अभियानातून ७०० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले, ग्रामीण भागात हे अभियान यापुढेही राबविण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला. मुलांवर भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी खूप परिणाम झाला. अशास्थितीत योग्य उपाययोजना न आखल्यास त्याचे विपरीत परिणाम मुलांवर होतात व शिक्षणात असलेली रुची कमी होते. यातून शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढते. याचा दूरगामी परिणाम शिक्षणावर होतो. ही स्थिती टाळण्यासाठी सहयोगी शिक्षण अभियान हा उपक्रम समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून शांतीलाल फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्र सुरू आहेत.
शाळा बंद राहिल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा शासनाने सुरू केली. मात्र, ग्रामीण भागात आजही ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, इंटरनेट अशा सुविधा नाहीत. या सुविधांअभावी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणूनच गावात समाज विद्या केंद्र सुरू करण्यात आले आहे.
गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम सुरू झाला. गावातील एका स्वयंसेवकाला प्रशिक्षण दिल्यानंतर त्या स्वयंसेवकाने गावात विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणे सुरू केले व या माध्यमातून हे सहयोगी शिक्षण अभियान गतिमान झाले. आगामी काळात बीड जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू होईपर्यंत समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून ही शिक्षणाची चळवळ सुरूच राहणार आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे समन्वयक धनराज सोळंकी यांनी दिली.
२० मुलांचा एक गट
बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी २० मुलांचा एक गट तयार करून कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना शिक्षण दिले. मुलांना आनंद मिळेल आणि अभ्यासाची सवय राहील, अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थीही शिक्षणात गुंतून राहिले.
चौकट
बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान आजही सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यात १२, बीड - १०, पाटोदा - ३, आष्टी - ४ तर शिरूर कासार - ५ अशी विद्या केंद्र सुरू आहेत.