वडवणी : तालुक्यात सध्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, देवळा ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी २२ उमेदवार, तर सोन्ना खोटा ग्रामपंचायतमध्ये २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत आहेत.
सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन ग्रामपंचायतींमधील ८६ पैकी ५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
तालुक्यातील सोन्ना खोटा येथील ग्रामपंचायतमध्ये नऊपैकी ७ सदस्य बिनविरोध निघाले असून, २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. देवळा ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य असून, २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.
सात सदस्य बिनविरोध
सोन्ना खोटा गावातील नागरिकांनी एकत्रित बसून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी धडपड सुरू केली. यात ९ पैकी ७ सदस्य बिनविरोध निघाले असून, २ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होऊनच सदस्य निवड होणार आहे. सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवळा येथील २९, तर सोन्ना खोटा येथील २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली.
निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार कलीम शेख यांनी केले आहे.