शिरूर कासार : शिरूर नगर पंचायतची मालमत्ता कर व पाणी पट्टी अशी लाखोंची थकबाकी असून, ही बाकी भरून नगर पंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीकडून करण्यात आले. वसुलीची टक्केवारी अवघी १० टक्के असल्याने नगर पंचायतीला मालमत्ता जप्तीसारखी कठोर पावले उचलावी लागतील. ती वेळ येऊ नये, यासाठी तत्काळ कर भरणा करावा, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टी या दोन बाबींचा थकबाकीचा आकडा लाखांवर गेला असून, त्यात मालमत्ता कर थकीत मागणी १३.९३ लाख, तर चालू बाकीचा आकडा ७ लाख ७४ हजारांचा असा मिळून २१ लाख ६७ हजार आहे. पैकी थकीतमधून ४.५० हजारांची व चालु बाकीत ३.३२ हजार अशी ७.८२ हजार वसुली आहे. पाणीपट्टीची थकीत बाकी ३ लाख ७४ हजार, तर चालू बाकी ५५ हजार आहे. यापैकी थकीतमधून ३१ हजार, तर चालू बाकीतून १५ हजार अशी ४६ हजारांची वसुली झाली असली तरी वसुलीची टक्केवारी अगदी कमी असल्याने जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे आता वसुलीसाठी सक्ती करणे क्रमप्राप्त बनले आहे. बाकी वसुलीसाठी वेळ पडल्यास मालमत्ता जप्तीसारखी कठोर कारवाई करावी लागेल. त्यासाठी नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या थकबाकीचा वेळीच भरणा करावा.
शहराला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कर वसुली करणे, हाच पर्याय असल्याने करबाकी भरणाबाबत नोटीस बजावल्या आहेत. आता बाकी न भरल्यास थेट कारवाई अटळ असल्याने नगर पंचायत कार्यालयात अथवा कर्मचारी यांचेकडे रितसर पावती घेऊन भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.