गेवराई : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित होणार असून, याठिकाणी ऑक्सिजनची सुविधासुद्धा उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते. रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही दूरध्वनीवरुन चर्चा केली.
आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीनसह मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक यंत्रसामुग्री पंडित यांच्यातर्फे भेट देण्यात आली. दिनांक १० एप्रिल रोजी गेवराई येथे वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला असून, शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीमध्ये हे सेंटर सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे.
गेवराई येथून मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण उपचारासाठी बीड येथे जातात. यावेळी अनेकांना ऑक्सिजन बेडसह इतर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी गढी येथील जयभवानी शिक्षण संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.
अमरसिंह पंडित यांच्या सहकार्याने गेवराई तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्यामुळे आता कोविड रुग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांनी या जागेची पाहणी करुन आरोग्य सुविधा उभारण्याबाबत मार्गदर्शन केले. गेवराई तालुक्यातील कोविड रुग्णांना भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टीकोनातून पंडित यांनी हे पाऊल उचलले आहे. या कोविड सेंटरचा मोठा फायदा तालुक्यातील रुग्णांना होणार आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवरील भार यामुळे कमी होणार आहे.
===Photopath===
100421\img-20210410-wa0354_14.jpg
===Caption===
आरोग्यविषयक आढावा बैठकीत माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यासह तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते.