गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी गट शिवारात शेतातील वीस वर्षांपूर्वीचे जुने, बहरलेले, मोठे आंब्याचे झाड शेजारच्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक पेटवून देऊन जाळले. त्यामुळे हतबल झालेल्या राजामती रखमाजी हंडाळ नामक शेतकरी महिलेने गेवराई पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधित शेतकऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
तालुक्यातील तळणेवाडी येथील गटनंबर ३८८ मध्ये वीस वर्षे जुने असलेले आणि बहरलेले मोठे आंब्याचे झाड आहे. याच शेताच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याने उसाचे पाचट जाळण्याचा बहाणा करून आपल्या शेतातील हे आंब्याचे झाड जाणीवपूर्वक जाळले असल्याची तक्रार राजामती हंडाळ यांनी २७ डिसेंबर रोजी गेवराई ठाण्यात केली आहे. फळ देणारे आंब्याचे झाड जाळणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी हंडाळ यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत आज, सोमवारी घटनास्थळी जाऊन गेवराई पोलीस पंचनामा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जाणीवपूर्वक फळझाड जाळल्याने संतप्त झालेल्या राजामती हंडाळ यांनी आपण याबाबत वनविभागाकडेही तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.