आष्टी : तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या ७० जागांसाठी ३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३१९ उमेदवारी अर्ज पात्र तर १२ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाने अर्ज मागे घेतला आहे. १४० अर्ज मागे घेण्यात आले, तर १७९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
आष्टी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणारी बंडाळी रोखण्यासाठी आमदार, माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य लक्ष देऊन होते. गावातील राजकीय पुढाऱ्यांनी सोमवारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात राहून शर्तीचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्याला काही प्रमाणात यशही आले.
शेरी ग्रामपंचायतीला मिळणार २१ लाख निधी
जी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर त्या गावाला विकासासाठी २१ लाख निधी देणार, असे आ. बाळासाहेब आजबे यांनी जाहीर केले होते. आता तालुक्यातून एकमेव शेरी ग्रामपंचायत मानकरी ठरली.
हातोला ग्रा.पं.मध्ये ६९ (४०), डोईठाण २९ (१५), धनगरवाडी (डो) १५, (२), कऱ्हेवाडी २८.( १४), कऱ्हेवडगाव ४० (२५), सोलापूरवाडी २१ (४), खुंटेफळ-पुंडी २९ (१२), पिंपळा २४ (५), सुंबेवाडी २० (१०), धनगरवाडी (पिंपळा) २१ (७ ), वटणवाडीत २१ उमेदवार रिंगणात असून ६ जणांनी माघार घेतली.
आष्टी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींपैकी शेरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर उर्वरित ११ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी सांगितले.