बीड : बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३६३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची गरज असून ११४६ वर्गखोल्या धोकादायक आहेत. मागील तीन वर्षापासून मंजुरी नसल्याने वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचे तसेच नवीन वर्गखोल्यांचे आणि इमारतींची कामे रखडली आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायचे कसे? असा प्रश्न पालक करीत आहेत.
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारतींचे काम होत असले तरी प्रमाण अत्यंत कमी आहे. तर दुसरीकडे वीस ते पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या शाळांच्या वर्गखोल्यांची पडझड झालेली आहे. मात्र या शाळांच्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीबाबत नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतींची तसेच वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाते. यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रस्ताव पाठविले जातात. मात्र समग्र शिक्षा अभियानाकडून २०१७-१८ पासून नवीन वर्गखोल्यांना मंजुरी मिळालेली नाही. ४६ वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर झाला होता, त्यापैकी ३३ वर्गखोल्यांसाठी निधी देण्यात आलेला आहे. या नवीन खोल्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. मात्र मोठ्या संख्येने धोकादायक असलेल्या आणि दुरुस्तीची गरज असलेल्या वर्गखोल्यांचे काय? असा प्रश्न अजूनही कायम आहे.
समग्र शिक्षा अभियानाशिवाय जिल्हा नियोजनातूनही वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्याचा विषय मागे अनेकवेळा ऐरणीवर आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १३२ वर्गखोल्यांना मंजुरी देण्यात आली होती. एका वर्गखोलीसाठी ८ लाख रुपये खर्चाची तरतूद आहे. ही कामे सुरू आहेत.
------------
मागील काही वर्षांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या वर्गखोल्यांची अवस्था बकाल झालेली आहे. पावसाळ्यात छतावाटे वर्गात पाणी साचते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे आणि गुरुजींनी शिकवायचे कसे? असा प्रश्न निर्माण होतो. पाऊस थांबला, पाणी ओसरले की पुन्हा शाळा तशाच भरतात. जिल्ह्यात १६० शाळांना इमारती नसल्याने पत्र्याच्या शेडमध्ये भरतात, अशी माहिती मिळाली आहे. जि. प. शाळांच्या ९ हजार ६५५ वर्गखोल्यांपैकी ५९२१ चांगल्या स्थितीत आहेत, तर ३ हजार ७३४ वर्गखोल्यांची कामे करणे गरजेचे आहे.
----------
दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये निधीची गरज
अनेक शाळांचे पत्रे गंजले असून, छिद्र पडले आहेत. फरशी उखडलेल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्यांचे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आहेत. जि. प. शाळांच्या १३६३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी किमान पाच कोटी रूपयांची गरज आहे. समग्र शिक्षाकडून निधी वेळीच मिळत नसल्याने वर्गखाेल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
----------
मुलांना पाठवायचे कसे? पालकांचा प्रश्न
जिल्ह्यात १४४६ वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्याचबरोबर ३५-४० शाळांच्या इमारती निजामकालीन असून, त्यांचे आयुर्मान संपत आल्याने मोडकळीस आल्या आहेत. निजामकालीन शाळांच्या इमारतींसाठी शासनस्तरावर निधी मंजूर असलातरी या निधीची सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे. धाेकादायक वर्गखोल्यांमुळे तेथील पालकही आपल्या पाल्यांना पाठवायचे कसे? अशी विचारणा करतात.
--------
जिल्ह्यातील एकूण शाळा - २४९१
एकूण विद्यार्थी - १,७५,५३३
दुरुस्ती आवश्यक असलेल्या वर्गखोल्या -१,३६२
धोकादायक असलेल्या वर्गखोल्या -१४४६
बीड २२४
अंबाजोगाई ८४
आष्टी २२४
पाटोदा ८५
परळी १२१
गेवराई २१८
माजलगाव १२५
शिरूर ११२
वडवणी ७०
धारूर ८१
केज १०२
-----------
===Photopath===
210621\21_2_bed_19_21062021_14.jpeg
===Caption===
दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील वर्गखोल्या