टाटा मोटर्स सध्या फुल फॉर्ममध्ये आली आहे. आजच टाटाच्या देशातील सर्वात कमी किंमतीच्या इलेक्ट्रीक कारचे लाँचिंग आहे. टाटाच्या नेक्सॉनने कंपनीचे नशीब चमकविले आहे. ती टाटाला पॅसेंजर वाहनांच्या श्रेणीत यश मिळवून देणारी कार ठरली आहे. महत्वाचे म्हणजे हीच कार देशाची सर्वात पहिली सेफेस्ट कार बनली होती. त्यानंतर टाटाने आणखी एक फाईव्ह स्टार कार भारतीय रस्त्यांवर उतरविली होती. ती म्हणजे टाटा अल्ट्रॉझ.
टाटा अल्ट्रॉझ ही तशी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देणारी कार आहेच, पण प्रिमिअम फिल देणारी देखील आहे. आम्ही ही कार खड्ड्यांच्या, निसरड्या, घाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोकणात ११६० किमी चालविण्याचा अनुभव घेतला. मायलेज, खड्ड्यांच्या रस्त्यावर, रात्रीच्यावेळी, धुक्यात ही कार आम्हाला कशी वाटली... चला जाणून घेऊया.
काही वर्षांपूर्वी टाटाच्या कार पाहून लोक नाक मुरडायचे. आता टाटाच्या कारवरून नजर हटत नाही, असाच लूक टाटा अल्ट्रॉझला देखील आहे. आतील केबिनही प्रिमिअम आहे. डिक्कीदेखील बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे तुम्ही चार जणांचे चार-पाच दिवसांचे साहित्य आरामात नेऊ शकता. हार्मनची इन्फोटेन्मेंट सिस्टिम प्रवासाचा आनंद आणखीनच वाढविते. असे असले तरी तीन सिलिंडरचे इंजिन बऱ्यापैकी आवाज करते. हेडलाईटचा फोकस एवढा जबरदस्त आहे की कुठेही रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात समस्या येत नाही.
आम्ही चालविली ती डिझेल कार होती. घाटावरील सपाट रस्ते, कोकणातील अवघड नागमोडी आणि खड्ड्यांचे रस्ते असे ११६० किमी अंतर कापले. मोठ्या खड्ड्यांतून गाडी जाताना धाड असा आवाज जरूर येत होता, पण आतमध्ये जाणवत नव्हते. परंतू, ओबडधोबड खड्ड्यांच्या रस्त्यावर कार आरामात धावत होती. ब्रेकिंगही उत्तम होते. समोरील सी पीलर अपघातावेळी वाचविण्य़ासाठी जास्त जाड असले तरी ते काही प्रमाणात डाव्या आणि उजव्या बाजुकडील दृष्यमानता कमी करतात. यामुळे सावध राहणे चांगले.
उन्हाळा नसला तरी उघडीपीवेळी एसीने चांगले काम केले. मागच्या सीटचा व्हेंटदेखील बऱ्यापैकी हवा थंड करत होता. इन्फोटेन्मेंट सिस्टिमची टचस्क्रीनदेखील एकदम स्मूथ चालत होती. गुगल मॅप लावल्यानंतर एक-दोनदा हँग झाली, त्यासाठी पुन्हा थांबून मॅप लावावा लागला एवढाच काय तो त्रास जाणवला.
रंगही थोडा जपायला हवा, निळा, लाल रंग घेत असाल तर त्यावर छोट्या छोट्या गोष्टींचे जसे की रस्त्या शेजारच्या गवताच्या काड्यांचे देखील ओरखडे उमटतात. ते स्पष्ट दिसतात. यामुळे काही दिवसांनी रंगाचा बेरंग होऊ शकतो. यामुळे ते जपायला हवे.
दोन मोड, पण कोणता चांगला...या कारमध्ये इकॉनॉमी आणि सिटी असे दोन मोड देण्यात आले आहेत. यापैकी इकॉनॉमी मोडमध्ये डिझेलची कार असून सीएनजीवरील कार चालविल्याचा फिल येत होता. इंजिनची ताकद एकदम कमी व्हायची. यामुळे चढणीला किंवा ओव्हरटेक मारताना सिटी मोड ऑन करावा लागत होता. यामुळे सपाट रस्त्यांसाठी इको मोड एकदम परफेक्ट होता. चढणीला सिटी मोड ऑन केल्यास कारचा जबरदस्त फिल येत होता. सिटी मोड ऑन करताच मिळणारा रिस्पॉन्सही काही क्षणांत मिळत होता. गिअर टाकताना दुसऱ्या गिअरसाठी थोडी अडकण्याची समस्या येत होती.
मायलेज...1160 किमीचे डोंगर उताराचे, पुणे-बंगळुरू हायवेवरील अंतर कापण्यासाठी जवळपास ७० लीटर डिझेल लागले. बहुतांश प्रवास हा इको मोडवरच झाला, कारने १८.७ किमी प्रति लीटरचे मायलेज दाखविले, तर आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे १६.५ ते १७ किमी प्रति लीटरचे मायलेज मिळाले. कारच्या बिल्ड क्वालिटीचा विचार केल्यास ते ठीकठाक होते. दीड हजार सीसीच्या कार २०-२२ पर्यंतचे मायलेज देतात. पुण्यातून जाताना वाहतूक कोडीं नव्हती, परंतू येताना सुमारे तासभर प्रचंड वाहतूक कोंडीत गेला, त्याचाही परिणाम मायलेजवर जाणवला.
एकच मोठा दोष...अनेकजण तक्रारी करतात, ही कार जाताना धुरळा खूप करते... म्हणजे, पाठीमागचा भाग, काच पार पाऊस असेल तर चिखलाने आणि पाऊस नसेल तर धुरळ्याने माखते. हॅचबॅक असली तरी हा प्रॉब्लेम या कारमध्ये खूप आहे. यामुळे तुम्हाला वारंवार वायपरचे पाणी मारावे लागते. नाहीतर पाठीमागचे काही दिसत नाही.
सच्ची रेंज...टाटाची ही कार जेवढी रेंज दाखवायची, तेवढी ती जात होती. म्हणजेच जर या कारने १०० किमीची रेंज दाखविली तर उरलेल्या इंधनात ती तेवढी जायची. टाटाने हे एक चांगले फिचर डेव्हलप केले आहे. फुल टँकला ही कार ४८० च्या आसपास रेंज दाखविते, परंतू ६०० किमीचे अंतर कापते. हे तुमच्या चालविण्याच्या स्टाईलवर, रस्त्यांवर बरेचसे अवलंबून आहे.