निस्सान ही ऑटो कंपनी संकटात सापडली आहे, होंडासोबतची डील रद्द केल्यानंतर आता एकामागोमाग एक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. भारतातील प्रकल्प सहकारी कंपनी रेनॉकडे देण्याच्या घोषणेनंतर जगभरातून सुमारे २० हजार कर्मचारी काढून टाकण्याची तयारी करत असल्याचे वृत्त होते. परंतू, आता भारतासह जगभरातील बहुतांश प्रकल्प बंद करणार असल्याचे वृत्त येत आहे.
फोक्सवॅगनवरही अशीच वेळ आली आहे. फोक्सवॅगन जर्मनीतील त्यांचे बहुतांश प्लांट बंद करत आहे. निस्साननेही जपानमधील दोन प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू, आता भारतासोबत दक्षिण आफ्रिका आणि अर्जेंटीनामधीलही उत्पादन प्रकल्प बंद करण्याची तयारी केली जात आहे. एवढेच नाही तर मेक्सकोमध्ये काही फॅक्टरी बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.
१९६१ पासून उत्पादन करत असलेला जपानमधील ओप्पामा प्लांट बंद करण्याची तयारी केली जात आहे. याचबरोबर शताई नावाच्या उपकंपनीद्वारे चालवला जाणारा शोनान प्लांट (ज्यामध्ये निसानचा ५० टक्के हिस्सा आहे) देखील बंद केला जाऊ शकतो.यानंतर निसानकडे जपानमध्ये फक्त तीन वाहन असेंब्ली प्लांट शिल्लक राहणार आहेत.
निस्सानचे जगभरात १७ प्रकल्प आहेत. ही संख्या निस्सानला १० वर आणायची आहे. कंपनी प्रचंड तोट्यात आहे. चिनी आव्हानांना तोंड देण्यासाठी होंडासोबत मिळून एकत्र कंपनी करण्याचा काही महिन्यांपूर्वी प्लॅन केला जात होता. परंतू, होंडाने नव्या डीलमध्ये निस्सानचे अस्तित्व नाकारल्याने निस्सानने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता कंपनी तोट्यातून बाहेर येण्यासाठी उद्योगाची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे.