अमरावती ; जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या एक वर्षापासून रखडलेल्या बदल्या यंदाही कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने ३१ मे पर्यत बदल्या करण्याचे धोरण जाहीर केले आहे.मात्र १५ मे पर्यत कोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. अशातच बदल्या संदर्भात शासनस्तरावरून बदली प्रक्रियेचा कार्यक्रमच अप्राप्त आहे.तर कोरोनाचा वाढता संसर्ग अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही.परिणामी दिवाळीनंतरच बदल्यांची प्रक्रिया पार पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षकांना बदल्याचे वेध लागले आहे.याकरीता शिक्षण विभागाने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात बदल्याचे सुधारित धोरणही जाहीर केले आहे. त्यानुसार ३१ मे पर्यत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. याकरीता मे महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदे, सेवाज्येष्ठता यादी,संवर्गनिहाय याद्या,जिल्ह्यातील अवगड क्षेत्रातील गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.तसेच राज्यस्तरावरून शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु अद्यापपर्यतही ही सुविधा सुरू झालेली नाही.त्यामुळे शिक्षकांमध्ये बदल्या होणार की नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे.
बॉक्स
बदल्या मे मध्येच की नंतर
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षण विभागाने बदल्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष बदल्यात आले तसेच यंदा पाच टप्यात बदल्या होतील.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तसेच हरकतीसाठी निश्चित केलेल्या कालावधी पाहता ३१ मे पूर्वी बदल्या होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.
कोट
शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नियोजन केले आहे. मात्र बदल्याची प्रत्यक्ष प्रक्रिया केव्हा सुरू होईल हे वरिष्ठस्तरावरून आदेश आल्यानंतरच सांगता येईल. सध्या काेरोनाचा वाढता संसर्ग पाहता बदली प्रक्रिया लांबण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
एजाज खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक