अमरावती : खासगी प्राथमिक शाळांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांही मार्केटींगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययना बरोबरच जिल्हा परिषद शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटींग केले जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये गावाच्या दर्शनी भागात जिल्हा परिषद शाळांचे फ्लेक्स झळकणार आहेत.खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सेमी इंग्रजी विषयनिहाय शिक्षक, संगणक, विविध शालेय उपक्रम व त्यांना दिली जाणारी व्यापक प्रसिद्धी यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता ओढा आहे. परिणामी शहरालगत व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसमोर रोडावलेली पटसंख्या वाढविण्याचे आव्हान आहे. घटत्या पटसंख्येला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. (प्रतिनिधी)
जि.प. शाळाही करणार मार्केटिंग
By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST