१४ पंचायत समितींना भेटी : पदाधिकाऱ्यांकडून आरोपाचे खंडनअमरावती : मिनीमंत्रालयाचे शिलेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप पंचायत राज समितीच्या प्रमुखांनी केल्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच धडकी भरली आहे.विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने मागील गुरूवार ते शनिवार अशा तीन दिवस जिल्हा परिषदेत लेखा परीक्षण केले आहे. याशिवाय १४ पंचायत समिती कार्यालयातही आढावा घेतला. प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्यात. विकास कामाचीही पाहणी केली आहे त्यामुळे त्यांना जे काही दिसून आले त्याचा अहवाल विधान मंडळाकडे सादर करावा. त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारानुसार काम करणे अपेक्षित आहे. मात्र पंचायत राज समितीच्या प्रमुखांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका मांडत पीआरसीच्या या कृतीबाबत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेत काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. मुद्राणलयाचा घोळ हल्लीच उघडकीस आला. मात्र घोळाचा गुंता पंचायतराज समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचल्यावर याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे पीआरसी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीत भेटी न देण्यामागे काय गौडबंगाल आहे याबाबत शंका उपस्थित होत आहे. तथापी दुसरीकडे वास्तविक पोषण आहारात पुरवठादाराकडून कमी वजनाची पोती पाठविण्यात येतात तर ती मोजण्यासाठी वजनकाटे देण्यात येत नसल्याची शिक्षकांची ओरड आहे, अशी स्थिती असताना झालेल्या अनियमिततेसाठी पदाधिकाऱ्यांना का बदनाम केले जाते असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पीआरसीने कुठलीही पाहणी करताना वेळ काळ न पाहता सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी शिक्षक महिला कर्मचारी यांना भेटी देण्याच्या नावाखाली ताटकळत ठेवले.
पीआरसीच्या आरोपाने जिल्हा परिषदेत धडकी
By admin | Updated: November 10, 2015 00:36 IST