टाकळी गिलबा येथील प्रकार : युवा कमिटीचा पुढाकार
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील टाकळी गिलबा येथील युवकांच्या कमिटीने गावानजीक अर्धा किमी अंतरावर बेंबळा नदीच्या काठावर सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.
कोरोनाच्या संकटामुळे देशी दारूची दुकाने बंद आहेत. यामुळे टाकळी गिलबा या गावात पिंपरी निपाणी, टाकळी कानडा, पिंपळगाव बैनाई व आजूबाजूच्या गावांतील लोक दारू पिण्यासाठी टाकळीत येत असल्याचे गावातील युवकांच्या निदर्शनास आले. बाहेरील लोकांच्या वर्दळीमुळे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी युवकांनी मंगळवारी गावठी दारूचा अड्डाच उद्ध्वस्त केला.
पिंपरी निपाणी शिवारात असलेल्या या ठिकाणी ३०० लिटर मोहा माच, १६ टिन पिंप व दोन प्लास्टिक डबक्या अशा दारू भरलेल्या साहित्याची तोडफोड करण्यात आली. युवकांना पाहताच दारू गाळणारी मंडळी पसार झाली. पोलीस पाटील अभिजीत थोरात, युवराज राठोड, सोनू राठोड, नितीन राठोड, अभिषेक राठोड, प्रकाश राठोड, प्रवीण राठोड, आनंद राठोड, युवराज पवार, विवेक पवार, सुनील राठोड, अनिल पवार, अजय पवार, अनिल राठोड, कुणाल इंगोले, पवन गिलबे, जीवन गिलबे, अविनाश माटोडे, अर्पित इंगोले रोहन राठोड, शुभम राठोड, सचिन पवार, अजय जाधव, गजानन राठोड, चेतन गिलबे, रोशन गिलबे, रवि पवार, आशिष राठोड, गोपाल राठोड, विकी पवार, राजेश पवार, प्रवीण शेळके, चरण राठोड यांनी दारूअड्डा उद्ध्वस्त केला. त्यांना येथील महिला मंडळाचेही सहकार्य लाभले.