अमरावती : कोरोना महामारीच्या संकटात नियमित योगासन केल्यामुळे मनुष्याच्या जीवनशैलीत बदल घडून निरोगी जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाव्दारे जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रात नागरिकांसाठी योग प्रशिक्षण नि:शुल्क योगाचे धडे दिले जात आहे.
योगा फक्त योगासनापुरताच मर्यादित नसून योगसनाच्या माध्यमातून मन, शरीर व श्वासोच्छवास आदीचे संतुलन राखले जाऊन मनुष्याचा जीवनप्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो, असेही त्यांनी सांगितले. योगाचे खूप फायदे आहेत. योगा व्यक्तीला स्वास्थ्यवर्धक बनवून शरीरात ऊर्जा निर्माण करते. योगा मेंदू व विचारांना प्रभावित करतो. योगामुळे नकारात्मक विचार कमी होऊन ताण-तणाव, चिंता कमी होण्यासाठी मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा व पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते. वजन कमी व नियंत्रित करण्यास योगाचा फायदा होतो. शरीरातील काही विषद्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. अस्वस्थ मन नियंत्रित करण्यासाठी फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्याने स्नायु बळकट होतात. आपल्यातील सजगता वाढल्याने मनाचे लक्षण मनुष्याला सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताणतणावातून मुक्त होऊन मनाला शांत करू शकतो. शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते. अंतर्ज्ञान वाढविण्याची क्षमता योगामुळे प्राप्त होते.
बॉक्स
जिल्ह्यातील पीएचसीत प्रशिक्षण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास योग प्रशिक्षणाचे आयोजन होत असून त्याठिकाणी नियुक्त योग प्रशिक्षक दिवसाला दोन सत्रात योग शिबिर घेतात. आरोग्य वर्धिनी केंद्रात पुरुष व महिला, बालक, ज्येष्ठ आदी लाभार्थी या शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. जनतेने त्यांचे स्वस्थ्य राहण्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्यादृष्टीने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, डीएचओ दिलीप रनमले, अतिरिक्त डीएचओ रेवती साबळे व माता-बाल संगोपन अधिकारी विनोद करंजेकर यांनी केले आहे.